धनंजय मुंडेच्या हातात टिकाव आणि डोक्यावर पाटी!

बीड: पोलीसनामा ऑनलाईन

व्यासपीठावरून तडाखेबाज भाषण करणारे आणि विधानपरिषदेत सत्ताधाऱ्याना पळता भुई थोडी करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी गुरूवारी सकाळी हातात टिकाव आणि पाटी घेऊन परळी तालुक्यातील रेवली गावात श्रमदान केले. आपला नेताच श्रमदानासाठी पुढे सरसावला आहे म्हटल्यावर गावकऱ्याचा उत्साहही द्विगुणीत झाला आणि बघता बघता सारा गाव श्रमदानासाठी जमा झाला.

 

परळीतील रेवली गावाने वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला असून गेले काही दिवसांपासून येथे गावकरी श्रमदान करीत आहेत. आज (गुरूवारी) सकाळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रेवली गावात पोहोचले. यावेळी त्यांचा पेहरावही नेहमीपेक्षा वेगळाच होता. नेहरू शर्ट,कोल्हापुरी चप्पल आणि पायजम्यात नेहमी दिसणारे मुंडे अंगात टी-शर्ट, स्पोर्ट शूज आणि स्पोर्ट पॅन्ट घालून आले होते. रेवली गावात पोहोचल्यावर त्यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती गावकऱ्यांकडून घेतली आणि त्यानंतर हातात टिकाव घेऊन त्यांनी खोदकाम केले. या वेळी त्यांनी डोक्यावर पाटी घेऊन मातीही टाकण्याचे काम केले. आपला नेता आपल्यासोबत काम करतो हे पाहिल्यानंतर लोकांनीही अतिउत्साहाने काम केले.

धनंजय मुंडे कायम सामाजिक कामात सहभागी होत असतात. सामुदायिक विवाह सोहळा , मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा असोत , सामाजिक संस्थांना भेटी , हरिनाम सप्ताह अशा अनेक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. दुष्काळ आणि पाणी टंचाईचे कामयस्वरूपी निर्मुलन करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील रेवली, मलनाथपुर, परचुंडी या तीन गावांमध्ये त्यांनी 3 तास श्रमदान केले. आज सकाळी 7 वाजता त्यांनी रेवली या गावातून गावकऱ्यांसह श्रमदान करायला सुरुवात केली पुढे मलनाथपुर आणि परचुंडी या गावातही त्यांनी श्रमदान केले. वॉटरकप स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गावांना स्वतः श्रमदान करून त्यांनी प्रोत्साहन दिले.

पुढील तीन दिवस धनंजय मुंडे हे मतदार संघातील विविध गावांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन श्रमदानात सहभागी होणार आहेत ही स्पर्धा कोणीही जिंको त्यापेक्षा पाण्याची चळवळ यशस्वी होणे आणि गाव टंचाईमुक्त होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या गावांमध्ये सुरू असलेला कामांसाठी लागणारे डिझेल तसेच इतर साहित्यही देण्यात येणार आहे.