धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मुख्यमंत्री ठाकरेंकडे पोहचलं रक्तानं लिहीलेलं पत्र

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन- धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहण्याचे आंदोलन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं. त्याअनुषंगाने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपाची सत्ता असताना पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे धनगर आरक्षण कृती समितीने मागणी केली असता. आपण स्वतः यात लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिलं होत. दरम्यान, राज्यात महविकास आघाडीचे सरकार आले आणि मुख्यमंत्रीपदी खुद्द उद्धव ठाकरे हे विराजमान झाले.

मात्र, अजूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. तसेच धनगर समजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा आरोप समाजाच्या नेत्यांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ( दि. १३ ) पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. त्यात धनगर समाजास तात्काळ आरक्षण द्यावे, मेंढपाळ बांधवांवर होणारे अत्याचार थांबवावे आणि धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी अशा काही मागण्या या रक्ताने लिहलेल्या पत्रात करण्यात आल्या.

तसेच मुख्यमंत्री व राज्य सरकारने या पत्राची तात्काळ दखल न घेतल्यास या रक्ताची किंमत महाविकास आघाडी सरकारला चुकवावी लागेल असा इशारा धनगर समाजाचे नेते माउली हळणवर यांनी दिली. यामुळे या पत्राची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.