धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा : डॉ. लोंढे

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकेकाळी शासनकर्ती जमात असलेल्या धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा तरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रभाकर लोंढे यांनी केले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४३ व्या जयंतीनिमित्त धनगर जमात संघटना राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीद्वारा राजुरा येथे आयोजित धनगर समाज मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या मेळाव्याचे उदघाटन धनगर संघर्ष समितिचे विभागीय अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार ॲड.संजय धोटे,नगराध्यक्ष अरुण धोटे, कामगार नेते साईनाथ बुच्चे, सावली पं. स. सदस्य विजय कोरेवार, जिवतीचे पं. स. उपसभापती महेश देवकते, संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप शेरकी, प्राचार्य गजानन शेळके, संघर्ष समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष विलास शेरकी, राजुरा तालुका धनगर जमात संघटनेचे अध्यक्ष रुपेश चिडे, सुमनताई शेळके, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी उद्धवराव मोंढे, जेष्ठ मार्गदर्शिका सुमनताई मसाडे, मुख्याध्यापिका इंदिराताई येवले, विशाल सोन्नर, पुंडलिकराव उराडे, घुलाराम तेलंग, बळीराम खुजे, गोपाळराव बुरांडे, गणपतराव बोधे, भाऊराव खाडे, कैलास उराडे, विठ्ठलराव येवले,चरणदास झाडे, संजय चिडे, अनंता गोखरे, सुभाष चिडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. गंगाधर वाळले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद पोलीस अधिकारी छत्रपती चिडे व राजुरा येथील धनगर समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नामदेवराव मसाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा धनगर जमात संघटनेचे अध्यक्ष रुपेश चिडे यांनी केले. यावेळी शितल दत्ताजी बाजगीर हिने होळकरशाहीवरील भाषण उपस्थित समाजबांधवांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. श्रावणी दिनेश पोतले हिने सादर केलेले नृत्य व आरुषी धनंजय डवरे हिने सादर केलेले ‘मी अहिल्या होणार ग…’ या गाण्यावरील नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. याप्रसंगी धनगररत्न पुरस्कार-२०१८ प्रदान करण्यात आला.