बिरोबाची शपथ ! जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आज प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजप तिकीट देण्यात आले आहे.

मात्र, पडळकरांसाठी हि निवडणूक सोपी नसून बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला असून आतापर्यंत त्यांनी 5 वेळा विजय मिळवला आहे. त्याआधी शरद पवार देखील सहावेळा या मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे आता पडळकर त्यांना टक्कर देणार कि नाही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  पडळकर यांनी याआधी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 3 लाखांच्या घरात मते मिळाली होती.

त्यामुळे धनगर समाजात लोकप्रिय नेते असलेले गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीमधून रिंगणात उतरवले आहे. मात्र सध्या त्यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावेळी ते धनगर आरक्षणासाठी मेळावे घेत होते, त्यावेळचे त्यांचे  व्हिडीओ सध्या व्हायरल करून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर  म्हणत आहेत कि,भारतीय जनता पार्टीने जर धनगरांना आरक्षण दिले नाही तर माझ्या घरातील जरी कुणी उभं राहिलं तरी  भाजपला मतदान करायचं नाही ,बिरोबाची शपथ हाय, अशा प्रकारे त्यांनी लोकांना आवाहन केले आहे. त्यामुळे आता विरोधक त्यांच्या याच व्हिडिओचा वापर करून त्यांच्यावर टीका करत आहेत.

दरम्यान, त्यांना भाजपने तिकीट दिल्यानंतर आता भाजपने अजित पवार यांना पराभूत करण्यासाठी मोठी तयारी केली असून त्याठिकाणी ते मोठा जोर लावणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेचे देखील बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com