गोपीचंद पडळकरांना दुसरा मोठा धक्का ! धनगर समाजाच्या बड्या नेत्याने घेतली विरोधी भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या राज्यभर चर्चेत आले आहेत. मात्र, पडळकर यांना आता दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांच्यानंतर आता राज्यातील धनगर समाजाचे आणखी एक मोठे नेते प्रकाश शेंडगे यांनीही पडळकरांवर टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर यांचे बोलवते धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत. पडळकर जे बोलले आहेत ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ती संपूर्ण धनगर समाजाची भूमिका नाही. बहुजन समाजातील नेते संपवणे हे भाजपचे पाप आहे. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण भाजप देणार होते. मग दोनशे कॅबिनेट झाल्या तरी आरक्षण दिलं नाही. असा घणाघात प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतूनच सुटणार आहे. भाजपची केंद्रात सत्ता आहे. मग धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत ? असा खरमरीत सवालही प्रकाश शेंडगे यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजपकडून आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांची आगामी काळात अडचण होण्याची शक्यता आहे.

धनगर आरक्षण समितीतून हाकालपट्टी
काही दिवसांपूर्वीच वेळापूर येथे धनगर समाज कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजातील नेत्यांनी ही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना धनगर समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली. तसेच आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहिला आहे. त्यातच असे बेताल वक्तव्य करून समजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकरांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठेही सहभागी करून घेतले जाणार नसल्याचे जानकर यांनी जाहीर केले.