खा. संभाजीराजेंचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठींबा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणा प्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर करावी, अशी विनंती करत शुक्रवारी दुपारी माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी संभाजीराजे यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाची व्याख्या करतानाचा धनगर बांधवांचा सुद्धा त्यात समावेश करुन त्यांना तेव्हा आरक्षण दिले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जसा माझा लढा आहे, तसाच तो धनगर समाजासाठी असणार आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठींबा दर्शवला.

बैठकीनंतर बोलताना संभाजीराजे यांनी म्हटलं की, धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोल्हापुरात गोलमेज परिषद घेण्यात आली. मला आनंद आहे की, संयोजकांनी त्यासाठी कोल्हापूरची निवड केली. कारण ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जे बहुजन समाजाला आरक्षण दिले त्यात एस. टी, एन. टी, ओबीसी, मराठा समाजाचा समावेश होता. राम शिंदे यांना मी सांगितले की, पाठींबा मागण्याची गरज नाही.

राजर्षी शाहू महाराजांनी जनकबहीण चंद्रप्रभा घाटगे यांचा विवाह यशवंतराव होळकर यांच्याशी केला. ती नाळ तेव्हापासून जुळलेली आहे. धनगर समाज हा प्रामाणिक असून, राजर्षी शाहू महाराजांनी जशी त्यावेळी या समाजाविषयी जबाबदारी पार पाडली, तशीच ती आमचीही जबाबदारी आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

त्यानंतर राम शिंदे म्हणाले की, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवत आहेत. मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा आहे. मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत. मराठा आरक्षणासोबत धनगर समाजच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन संभाजीराजेंनी धनगर समाजाला दिल्याचं राम शिंदे यांनी सांगितले.