धनगर आरक्षणाबाबत झालेली बैठक निष्फळ ; पुन्हा एकदा आश्वासनच 

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबाबत पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा दिल्या. मात्र ही घोषणा अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर नेते यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. काल धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचे धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा संघटनेचे प्रमुख गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

एसटीचे सर्टिफिकेट द्या, शिफारशींचा फार्स नको अशी मागणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास २७ फेब्रुवारीला चवदार तळ्यावरून शेळ्या-मेंढ्या, गुरं-ढोरं घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार असल्याचा इशारा, गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. तातडीने अध्यादेश काढून आरक्षण लागू केले नाही तर सरकार पाडू, असा आक्रमक पवित्रा धनगर नेत्यांनी घेतला आहे.

धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टीस) अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे. ‘टीस’चा अहवाल महाधिवक्ता यांच्याकडे दिला आहे. ते कार्यवाही करीत आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, धनगर आरक्षणावर तोडगा अद्यापही निघाला नसून मुख्यमंत्र्यांनी आश्वासनच दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी धनगर आरक्षणाबाबत केलेली मध्यस्थी निष्फळच ठरली आहे.