यशवंत सेनेकडून मुख्यमंत्र्यांना साडी-चोळीचा अाहेर

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – अनेक दिवसांपासून धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी मागणी सुरू आहे. परंतु आता ही मागणी  पूर्ण होत नसल्याचा रोष व्यक्त होताना दिसत आहे. यशवंत सेनेने शुक्रवारी (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देण्याचे आंदोलन केल्याचे दिसत आहे. विधानभवनासमोरच हे आंदोलन करण्यात आले. इतकेच नाही तर विधानभवनासमोर झालेल्या या आंदोलनात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते असे यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी सांगितले. परंतु अजूनही या आरक्षणावर तोडगा काढण्यात आलेला नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर पुढे त्यांनी असेही सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण दिल्यावरही धनगर समाज मात्र आरक्षणापासून वंचित आहे. या प्रश्नावर धनगर नेत्यांना मंत्रीपद देऊन सरकारने गुंडाळले आहे. त्यात कॅबिनेट मंत्री महादेव जानकर खासदार विकास महात्मे आणि राम शिंदे यांचा समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान सदर तीनही नेत्यांनी 10 दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिल्याचे समजत आहे. याशिवाय धनगर समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा न काढल्याने सदर आंदोलनातून रोष व्यक्त होताना दिसत आहे.