‘ढोल बजाओ सरकार जगाओ !’, आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा ‘एल्गार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एसटी प्रवर्गाचं आरक्षणं मिळावं या मागणीसाठी धनगर समाजानं शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे. राज्यभरात धनगर समाजाचा एल्गार पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ सरकार जगाओ अशा घोषणा देत आंदोलन केलं जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत आहे. धनगरी ढोल वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. माळशिरस येथे सकाळी धनगर समाज बांधवांनी सरकारविरोधात ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसंच पंढरपुरातही धनगर समाज बांधवांनी आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावं यासाठी आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून धनगर समाजाचे बांधव ढोल वाजवत आंदोलन स्थळाकडे येऊ लागले आहेत. भंडाऱ्याची उधळण करत आणि धनगरी नृत्य करत सर्व धनगर बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पंढरपुरातील आंदोलनस्थळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर दाखल झाले आहेत. धनगर आरक्षणासाठी पंढरपुरातून धनगर बांधव जमू लागले आहेत. धनगरी ढोलचा आवाज पिवळ्याधमक भंडाऱ्याची उधळण आणि नृत्य असा माहोल पंढरपुरात दिसत आहे.

जे आदिवासींना तेच धनगरांना

नाशिक जिल्ह्यातही आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. जे आदिवासींना तेच धनगरांना अशी घोषणा देत ढोलताषे घेत धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे.

नांदगावला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून डफली बजाओ आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाला आरक्षण देऊन तसा अध्यादेश काढण्यात यावा या मागणीसाठी आता धनगर समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी तहसिलदारांना एक निवेदनही देण्यात आलं.

बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव तहसिल कार्यालयासमोर ढोल वाजवून सरकारला जागं करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेकडो धनगर बांधव सहभागी झाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like