‘बदनाम’, ‘गद्दार’ म्हणून मला ‘हिणवलं’, आता न्याय झाला : धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भावाशी म्हणजेच आण्णांशी रक्ताचे नाते तोडण्याचा निर्णय जाहीर केला. मग त्यावेळी मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष हिणवले गेले. मात्र, न्याय उशिरा का होईना मिळत असतो त्याप्रमाणे आज हे दिवस आले. उशिरा होईना सत्याचा विजय होतो हे सिद्ध झाले, असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले आहेत. मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे आज पहिल्यांदाच परळीला जाणार आहेत.

मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते बीडमध्ये मुक्कामी होते. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा परळीत जात आहेत. परळीत धनंजय मुंडे यांचा नागरी सत्कार होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता ते परळीत पोहचणार आहेत. परळीत आल्यानंतर ते शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी साडेसात वाजता मोंढा परिसरात त्यांचा सत्कार होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील उपस्थित राहणार आहेत.

बीड मुक्कामी असताना धनंजय मुंडे यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, परळीच्या जनतेनं निवडून दिले. सरकार स्थापन झाले. आता परळीत येताना काही तरी जबाबदारी घेवून परळीला नागरी सत्कारासाठी जाणार आहे. खरे तर हे श्रेय परळी व बीडच्या जनतेचं आणि पवार साहेबांनी दिलेल्या जबाबदारीचे आहे.

धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांना नेतृत्वा सारखं खात मिळालं नसल्याची चर्चा सुरु झाली. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मी विधान सभेला पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद पवार साहेबांनी दिले. त्यामुळे सामाजिक न्याय हा विभाग कमी प्रतिष्ठेचा आहे हा गैरसमज चुकीचा आहे. सामान्य दीन, दलित, आदिवासी समाजाला मदत हे खाते चांगल्या प्रकारे करु शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/