बिल्डरच्या त्रासाला आणि प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून धानोरीच्या रहिवाशांचा ‘नोटा’ वापरण्याचा निर्धार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिल्डरच्या त्रासाला वैतागून धानोरी येथील पॅलॅडियम ग्रँड गृहसंकुलातील फ्लॅट धारकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना ‘नोटा’चा वापर करण्याचा निर्धार केला आहे. तसेच बिल्डरच्या त्रासाला आणि प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून आजपासून उपोषणास बसण्यासाठी रहिवाशांच्या वतीने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विजय सागर यांनी निवडणूक अधिकारी, जिल्हा अधिकारी, पोलिस कमिशनर यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

विजय सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 10 वर्षांपासून पॅलॅडियम गृहसंकुलातील ग्रँड फ्लॅट-धारक हे बिल्डरचा आणि त्यांच्याशी हितसंबध असलेल्या व्यक्तींचा त्रास सहन करीत आहेत. बिल्डरने महानगर पालिकेस अ‍ॅफिडेव्हिट दिलेले असून, त्यानुसार बिल्डरने स्वखर्चाने पाणी पुरविणे अपेक्षित आहे, परंतु तसे न झाल्याने फ्लॅट-धारक महिना 1 ते 1.5 लाख रुपये पाण्यावर खर्च करीत आहेत. नुसत्या पाण्यावर (टँकर) फ्लॅट-धारकांनी सुमारे रुपये एक कोटीचे वर खर्च केले आहेत. महानगरपालिका अ‍ॅफिडेव्हिट घेते पण त्याची अंमलबजावणी करीत नाही.

आज 10 वर्ष होऊन सुद्धा बिल्डरने कॉपरेटिव्ह सोसायटी बनु नयेत यासाठी सर्व प्रयत्न केले असून, जेव्हा बनली तेव्हा काही सदनिकाधारकांना सोबत घेऊन हायकोर्टात खटला दाखल करून तात्पुरती स्थगिती आणली आहे. याच बरोबर महानगरपालिकेने 2016 मध्ये आदेश देऊन सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर यांचे योग्य आणि परिपूर्ण काम केले नाही. 10 वर्षानंतर आजही गृहसंकुलापासून मुख्य रस्त्यास जोडणारा रास्ता बिल्डरने बनविला नाही, त्यामुळे दुचाकी वाहने पडण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत.

बिल्डरला त्याची फेज 2 प्रकल्प विकावयाचा असल्याने त्याने जुन 2018 मध्ये क्लब-हाऊस, स्विमिंग पूल, अँफि थिएटर या सुविधा नूतनीकरणाच्या कारणावरून ताब्यात घेतल्या असून, नुतनीकरण पूर्ण झाले असतांना देखील फ्लॅट धारकाना पुन्हा सुपूर्त केले नाहीत.

संकुलातील फ्लॅट-धारकांना 15 ऑगस्ट रस्त्यावर साजरा करावा लागला. याची रितसर पोलीस दफ्तरी नोंद केली असून बिल्डरवर कोणतीच कारवाई झाली नाही. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांचे हस्तक्षेपानंतर फक्त 7 दिवसांसाठी एक खोली वापरण्यास देण्यात आली. त्यानंतर बिल्डरने पत्रे लावून पुन्हा क्लब-हाऊस, अँफिथिएटर, स्विमिंग पूलकडे जाणारे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले आहेत. पोलिसांकडे रीतसर तक्रार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

बिल्डरच्या या मनमानीमुळे फ्लॅट-धारक हतबल झाले आहेत. याच मुळे त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नोटाचा अधिकार वापरण्याचे ठरविले आहे. याच उद्विग्नतेतून हे फ्लॅट धारक आज दि. 10 ऑक्टोबर 2019 पासून धरणे आणि साखळी उपोषण करत आहेत.

visit : policenama.com