अकोले मतदारसंघात धराडे, तळपाडे, भांगरे, मेंगाळ शिवसेनेकडून इच्छुक

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या मुंबईतील सेना भवनात आज मुलाखती पार पडल्या. अकोले विधानसभेसाठी कोले तालुक्यातील चार इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती शिवसेनेचे अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी दिली.

अकोले विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेला युतीच्या माध्यमातून सोडण्यात येत होता. मात्र पिचड पिता पुत्रांनी भाजपात केलेल्या अचानक ‘इन्ट्री’मुळे अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहे. ही जागा आता भाजपला जवळपास निश्चित झाली आहे. मात्र निष्ठावान शिवसैनिकांनी ही जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यतच भाजप शिवसेनेची युती अजून अधिकृत जाहीर झाली नाही. त्यामुळे भाजप सेनेने सर्वच्या सर्व 288 जागा लढण्याची तयारी ठेवली असल्याचे समजते.

अकोले विधानसभा मतदारसंघासाठी सेना भवनात आज माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, माजी आ.अरविंद नेरकर यांनी मुलाखती घेतल्या. अकोले तालुक्याच्या सुकन्या असलेल्या व पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माजी महापौर शकुंतला धराडे, गत विधानसभेचे उमेदवार मधुकरराव तळपाडे, अकोले पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती मारुती मेंगाळ, युवानेते सतीश भांगरे या चार इच्छुक उमेदवारांनी अकोले विधानसभेसाठी मुलाखती दिल्या. भाजप सेनेची युती अजून जाहीर झाली नसल्याने भाजप सेनेने सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे दोन्ही ही पक्ष सर्वच मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. यावेळी अकोले तालूकाप्रमुख मच्छीन्द्र धुमाळ, प्रदीप हासे, रामहरी गोर्डे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, महेश हासे आदी अकोले तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

आज अकोले विधानसभेसाठी शिवसेनेच्या मधुकरराव तळपाडे, सतीश भांगरे, मारुती मेंगाळ यांनी मुलाखती दिल्या. मात्र पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी ही मधुकरराव तळपाडे, सतीश भांगरे, मारुती मेंगाळ हे सेनेचे नेते उपस्थित होते. त्यामुळे हे तीनही उमेदवार दोन्ही दगडांवर पाय ठेऊन उभे असल्याची अकोले तालुक्यात चर्चा सुरू आहे. याउलट जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, सुनीता भांगरे हे देखील भाजपच्या मुलाखतींना उपस्थित होते. तर कट्टर पिचड विरोधक डॉ.किरण लहामटे हे केवळ राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात एकास एक उमेदवार देऊ अशी भाषा करणाऱ्या विरोधकांमध्ये देखील फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Visit – policenama.com