‘एफआरपी’साठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी २ हजार ६०० रुपये एफआरपीचा दर ठरला असला, तरी प्रत्यक्षात अनेक साखर कारखान्यांनी २ हजार २०० च्या आसपासच रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर ठेवली आहे. उर्वरित रक्कम व्याजासह मिळावी, या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्यावतीने अहमदनगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नगर व नाशिक जिल्ह्यात २७ साखर कारखाने येत असून एकाही साखर कारखान्याने घोषित झालेली २६०० रुपये रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलेली नाही. कोणी २ हजर, कोणी २१०० तर कोणी २२०० याप्रमाणे रक्कम दिली आहे. गाळपाला ऊस दिल्यानंतर १५ दिवसात एफआरपी न दिल्यास त्यावर १५ टक्के व्याज आकारणीचे साखर नियंत्रण नियमात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता एफआरपीची उर्वरित रक्कम १५ टक्के व्याजासह मिळावी, अशी मागणी असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी सांगितले.

पंधरा दिवसात एफआरपीची रक्कम न दिल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय किसान संघाच्यावतीने देण्यात आला आहे.