धारावी ‘कोरोना’मुक्तीच्या उंबरठ्यावर, फक्त 2 रुग्ण सापडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावी कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, धारावी झोपडपट्टीत राबवण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही मुंबईकरांसाठी एक सकारात्मक बातमी आहे. आज धारावीमध्ये फक्त दोन रुग्णांची नोंद झाली आहे. तर माहिम परिसरात 25 रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या तीन महिन्यापूर्वी धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळं धारावी कोरोनामुक्त करण्यात यश आलं आहे. धारावीच्या या पॅटर्नचं कौतुक केंद्र सरकारने देखील केलं आहे. बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार धारावीत आता 83 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहे. तर एकूण 2 हजार 545 रुग्ण आहेत. आतापर्यंत 2 हजार 212 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. धारावीत कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

धारावी कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असताना धारावीला लागून असलेल्या माहीममध्ये ही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. आज माहिममध्ये 25 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या माहिममध्ये 1657 रुग्ण उपचार घेत आहेत. माहिममध्ये आतापर्यंत 1357 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दादरमध्येही 25 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 1689 पर्यंत पोहचली आहे.