वाढदिवस विशेष : चित्रपटात येण्यापूर्वी धर्मेंद्र होते क्लार्क 

मुंबई : वृत्तसंस्था – धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबी कुटुंबात ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाब मध्ये झाला. चित्रपटात येण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. त्यांनी आपल्या चित्रपट करियरची सुरवात १९६० च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटापासून केली. तेव्हापासून ते आजपर्यंत धर्मेंद्र यांच्या अभिनयाची जादू त्यांच्या चाहत्यांच्या मनावर आणि सिनेसृष्टीवर कायम आहे.
शाळेत असल्यापासून सिनेसृष्टीचे आकर्षण  
शाळेत असल्यापासूनच त्यांना या सिनेसृष्टी विषयी आकर्षण होते. ते नेहमी आपली शाळा बुडवून चित्रपट बघायला जायचे दिल्लगी (१९४९) हा चित्रपट चाळीस पेक्षा जास्त वेळा त्यांनी पहिला. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी रेल्वे मध्ये क्लार्क म्हणून सव्वाशे रुपयात काम करायचे. एका स्पर्धेदरम्यान अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्रला ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटासाठी ५१ रुपये देऊन या चित्रपटात हिरोची भूमिका दिली. या चित्रपटात धर्मेंद्र सोबत नायिकेच्या भूमिकेसाठी कुमकुम होती. या नंतरच्या काळात धर्मेंद्रने अंबर (१९६२), बंदिनी (१९६३), सीरत (१९६३) हे चित्रपट केले. पण त्यांना खरी ओळख ओ. पी. रल्हन यांच्या ‘फूल और पत्थर’ (१९६६) या चित्रपटातून मिळाली.
‘सत्यकाम’ चित्रपटातील साधा -सरळ इमानदार हिरोची व्यक्तीरेखा असो किंवा ‘शोले’ चित्रपटातील व्हिलन शी दोन हात करणारा हिरो  किंवा ‘चुपके चुपके’ चित्रपटातील विनोदी भूमिका असो. आपल्या अभिनयाने त्यांनी या भूमिकांना नेहमीच न्याय मिळवून दिला. आपल्या चित्रपटातील स्टंट ते स्वतः करायचे. या दृश्यांसाठी त्यांनी कधीही स्टंटमॅन चा वापर नाही केला.
चित्रपटात आल्यावर धर्मेंद्र यांनी हेमामालिनी हिच्याशी दुसरा विवाह केला. दोघांनी तुम हसीन मै जवान (१९७०), आझाद (१९७८), सीता और गीता (१९७२) शोले (१९७५) यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले. हेमा यांच्‍या वडिलांना धर्मेंद्र-हेमा यांचं नातं मंजूर नव्‍हतं. हेमाने एका विवाहित व्‍यक्‍तीशी लग्‍न करू नये, असे त्‍यांना वाटत होतं. परंतु, हेमा आणि धर्मेद्र यांनी घरच्‍या मंडळींविरुध्‍द आणि धर्माची बंधने झुगारून विवाह केला. हेमामालिनीशी लग्न करायला धर्मेंद्र यांनी धर्म बदलला आणि दिलावर खान असं स्‍वत:चं नाव करून घेतलं.
हेमाशी रोमान्‍स करायला द्यायचे पैसे
चित्रपटाच्‍या शूटिंगनंतर धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांना भेटता येत नव्‍हते. त्‍यामुळे जवळपास शूटिंगनंतर त्‍यांचे भेटणे बंद झाले होते. त्‍यावरही धर्मेंद्र यांनी एक शक्‍कल लढवली. असे म्‍हटले जाते की, धर्मेद्र चित्रपटाच्‍या रोमॅंटीक शूटिंगवेळी हेमा यांच्‍याशी अधिक रोमान्‍स करता यावा म्‍हणून कॅमेरामॅनला पैसे द्‍यायचे. त्‍यामुळे हेमा यांच्‍यासोबत शूट सुरू असताना कॅमेरामॅन लाईट कमी असल्‍याचा बहाणा करून पुन्‍हा पुन्‍हा रिटेक देण्‍यास सांगायचे. धर्मेंद्र एक सीन पुन्‍हा पुन्‍हा रिटेक करण्‍यासाठी १०० र. द्‍यायचे. ‘शोले’ चित्रपटाच्‍या शूटिंगदरम्‍यान, ज्‍यावेळी धर्मेंद्र हे हेमा यांना झाडाचे आंबे तोडताना शिकवत होते. त्‍यावेळी तोच सीन १० पेक्षा अधिक वेळा रिटेक करण्‍यात आला होता.
शर्मिला टागोर यांचाही आज जन्मदिवस 
बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र बरोबरच आज जेष्ठअभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आज (८ डिसेंबर) वाढदिवस आहे धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर यांनी अनुपमा (१९६६) ,मेरे हमदम मेरे दोस्त (१९६८), यकीन (१९६९), सत्यकाम (१९६९), चुपके -चुपके (१९७५) यासारख्या अनेक दर्जेदार चित्रपटात एकत्र काम केले. या चितपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपट व्यतिरिक्त विशेष म्हणजे या दोघांनी एकत्र मिळून काम केलेल्या चित्रपटाची संख्या ही आठच आहे.