आणखी एका पुतण्याकडून काकांविरोधात ‘राजकारण’, शिवसेना अन् राष्ट्रवादी असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील धरणार काँग्रेसचा ‘हात’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. धवलसिंह मोहिते पाटलांचा गुरुवारी (दि. 28 ) आपल्या समर्थकांसह मुंबईतील काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. दुपारी तीन वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा होईल. धवलसिंह मोहिते यांच्या रुपाने सोलापूरमध्ये काँग्रेसला तरुण चेहरा मिळणार आहे. मोहिते पाटलांच्या घराण्यातील सदस्य काँग्रेसमध्ये येणार असल्यामुळे सोलापुरातील राजकारण आता ढवळून निघणार आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हात दाखवून भाजपच्या मंचावर जाऊन पोहोचले होते. तर त्यांचा मुलगा रजणतिसिंह यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय अंतर दुरावले होते. एकीकडे विजयसिंह मोहितेंनी जाहीरपणे भाजपला मदत केली होती. तर धवलसिंह यांनी मात्र राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हालचाल केली होती. परंतु, धवलसिंह शेवटी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.