रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचा भाऊ राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असतानाच त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे माजी सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चिन्ह आहेत. धवलसिंह यांनी मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. अकलूज परिसरामध्ये त्यांची मोठी ताकद आहे. युवा नेता म्हणून धवलसिंह यांची अकलूज परिसरात ओळख आहे. सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह यांनी त्यांचा पराभव करत कारखाना आपल्या ताब्यात घेतला.

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये धवलसिंहांनी सदस्य म्हणून काम केलं असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मोहिते-पाटील परिवार भाजपमय झाला असताना धवलसिंह आणि पवार यांच्या भेटीने राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण झालं आहे.

मुंबईत आज तासभर बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी दुपारी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली असून डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांनीही याला दुजोरा दिला आहे.