भावाभावात राजकीय कलगीतुरा ; धवलसिंहांनी साधला रणजितसिंहांवर निशाणा   

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन – रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे सख्ये चुलत बंधू धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता भोगली त्यांना जातीयवादी वाटणारा भाजप एका रात्रीत कसा चांगला वाटू लागला असा प्रश्न विचारत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर जनसेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. शरद पवार यांच्याशी भेट झाल्याचे त्यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे धवलसिंह आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत. राष्ट्रवादीत वर्षानुवर्षे राहून अनेक मंत्रीपदे भोगली. त्यांनी नेहमी भाजपला जातीवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना एका रात्रीत भाजप कसा आपलासा वाटू लागला असे धवलसिंह म्हणाले आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांची नुकतीच शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. त्यांनी या आधीच वर्षभरापासून शिवसेनेचे काम करणे बंद केले होते.