पुणे वाहतूक शाखेतील ‘ढेरपोटे’ पोलिसांना ड्यूटी नाही ; उपायुक्तांचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील प्रमुख चौकामध्ये यापुढे ढेरपोटे असलेल्या पोलिसांना काम देऊ नका, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिले आहेत. जास्त वजन आणि ढेरपोटे असलेल्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली असून ५९ ढेरपोटे पोलिसांना कार्य़ालयीन कामकाज सांभाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या कामाच्या वेळेमुळे अनेक पोलिसांचे तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेक पोलिसांना शारिरीक व्याधी जडतात. पुणे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आणि प्रमुख चौकामध्ये वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येते. अशी कामे करण्यासाठी तंदुरुस्त पोलिसांची नेमणूक करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत.

शहरातील प्रमुख चौकात नेमण्यात आलेल्या पोलिसांचे वजन आणि पोटाचा आकार वाढलेला असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी वजनदार आणि पोट वाढलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमनाची कामे देऊ नयेत. तसेच या कर्माचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज सांभाळण्याच्या सुचाना देण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेने पोट आणि वजन वाढलेल्या ५९ पोलिसांची यादी तयार केली आहे.

वाहतूक शाखेतील काही पोलीस निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी नियंत्रण कक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र वयाचा विचार न करता जास्त वजन असलेल्या पोलिसांना येत्या काळात प्रमुख चौकात वाहतुकीचे नियमन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

You might also like