INDvsAUS : शेवटच्या 2 सामन्यातून धोनीला वगळले 

रांची : वृत्तसंस्था – भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. हा सामना भारताला 32 धावांनी गमवावा लागला. सामना झाल्यावर संजय बांगर यांनी पत्रकार परिषद घेत पुढील दोन सामन्यांसंदर्भात काही माहिती दिली आहे. पुढच्या दोन सामन्यांसाठी संघात काही बदल करण्यात येणार आहेत. तर, माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला दोन्ही सामन्यात विश्रांती  देण्यात येणार आहे, अशी माहीती बांगर यांनी दिली.

शेवटच्या २ सामन्यांसाठी संघात काही बदल होतील. धोनी शेवटच्या २ सामन्यात खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी ऋषभ पंत संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे, अशी माहिती बांगर यांनी दिली.

मागील तीन सामन्यात धोनीने एकूण ८५ धावा केल्या. धोनीने पहिल्या सामन्यात नाबाद ५९ धावांची उत्तम खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात धोनीला चांगली खेळी करता आली नाही आणि तो शून्यावर बाद झाला. तिसऱ्या सामन्यात धोनी २६ धावांवर बाद झाला.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा सामना १० मार्चला मोहाली येथे होणार आहे. या मालिकेत भारत २-१ ने अशा आघाडीवर आहे.