जबरा फॅन, मैदानावरच धरले धोनीचे पाय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना नागपूर येथे सुरु आहे. या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीचा जबरा फॅन पाहायला मिळाला. भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा धोनीचा एक फॅन तिथे आला आणि त्याने थेट धोनीचे पायच धरले. यावेळी मात्र संघ सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला.

मैदानावर नेमके झाले काय ?
भारताचा पहिला डाव २५० धावांवर आटोपला. धोनीला या सामन्यात एकही धाव करता आली नाही. पण विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने २५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी आला. धोनीच्या जर्सीचा नंबर सात आहे. याच क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जर्सी या चाहत्याने परीधान केली होती. हा चाहता जेव्हा मैदानात धावत आला तेव्हा धोनीने त्याला पाहिले. हा चाहता जेव्हा धोनीच्या जवळ आला तेव्हा धोनी त्याला पाहून थोडा पुढे पळाला. यावेळी संघ सहकाऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. पण धोनीने या चाहत्याला नाराज केले नाही. धोनीने या चाहत्याला आपल्या जवळ बोलावले. त्यावेळी या चाहत्याने धोनीचे पाय धरले.