धुळे बस स्थानकातून महिलेची पर्स लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे बस स्थानकातून दोंडाईचा येथील महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी घडली. पर्समध्ये महागडा मोबाईल आणि रोख सहा हजार होते.

बाभूळवाडी – दोंडाईचा बस धुळे बस स्थानकात आल्यानंतर महिलेने लहान मुलाला चाॅकलेट घेण्यासाठी पिशवीतील पाकीटातील पैसे दिले व पाकिट पिशवीत ठेवले. याच वेळी बस स्थानकात फिरणाऱ्या चोर महिलांची नजर महिलेच्या पिशवीतील पाकिटावर गेली. दोन महिला चोरांनी शिताफीने जागृती भदाणे (रा. दोंडाईचा) यांच्या पिशवीतील पाकीट लंपास केले. पाकीटात महागडा मोबाईल आणि रोख सहा हजार रुपये होते. महिलेने आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोर महिला तेथून पळाल्या होत्या. नंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलीस चौकी आहे. मात्र हे फक्त शोभेसाठीच असल्याचे दिसते. या पुर्वीही धुळे बस स्थानकात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवरून चोरांवर पोलीसांचा वचक राहिलेला नाही असेच स्पष्ट होत आहे. नविन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील या चोरट्यांवर वचक निर्माण करतील का ? अशी चर्चा बस स्थानकात परिसरात नागरिकांमध्ये रंगली होती.