दरोडा टाकण्यासाठी आलेल्या ७ जणांना अटक, आलीशान गाडीसह २ पिस्टल जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – महामार्गावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात जणांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडून आलीशान गाडीसह दोन पिस्टल, तलवार आणि दरोडा टाकण्याचे साहित्य असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील अवधान एमआयडीसी परिसरात करण्यात आली.

अमित नामदेव पाटील (वय-३३ रा. बोरीवली), अभिषेक अरुण ढोबळे (वय-२९ रा. डोंबीवली), पंकज सुरेश साळुंखे (वय-२६ रा. डोंबीवली वेस्ट), जितेश पुकराज लालवाणी (वय-३० रा. डोंबीवली ईस्ट), विकास कांतीलाल लोंढे (वय-४२ रा. डोंबीवली वेस्ट), सुरेंद्र सुरेश चव्हाण (वय-४५ रा. मोहाडी उपनगर, धुळे), मंगेश कृष्णा भोईर (वय-३९ रा. डोंबीवली वेस्ट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मध्यप्रदेशातून एका आलीशान कार मधून काही व्यक्ती घातपात करण्यासाठी येणार असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. तसेच हे लोक महामार्गावरील टोलनाक्याजवळ एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली. मोहाडी पोलिसांच्या पथकाने महामार्गावर वाहनांची तपासणी करत असातना दीडच्या सुमारास अवधान एमआयडीसी परिसरातील बालाजी प्लाय कंपनीजवळ एक पांढ-या रंगाची इनोव्हा कार (एमएच ०३ एएम८५६२) झुडपांमध्ये थांबल्याची दिसली. या कारची तपासणी करण्यासाठी पोलीस गेले असता पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन टोलनाक्यावर आडवले.

पोलिसांच्या पथकाने गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक तलवार, चाकु, सहा मोबाईल, मिरची पुड व दोरी आणि इनोव्हा कारसह सात जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांकडे सखोल चौकशी केली असता दरोडा टाकण्यासाठी फिरत असल्याची माहिती आरोपींनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागीरी यासह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये खंडणी, दरोडा, शस्त्रबाळगणे असे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ पायमोडे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राम्हणे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे, प्रमोद जाधव, गणेश भामरे, सचिन वाघ, अजय दाभाडे, दिपक महाले यांच्या पथकाने केली.