पोलीसांमुळे ‘त्या’ १२ जणावरांना मिळाले ‘जीवदान’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गुरांना आणून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी छापा मारल्याने १० ते १२ गुरे पोलिसांच्या हाती लागली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कत्तलीसाठी आणलेली १२ जनावरे आझादनगर भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमीदाराकडून मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आझादनगर भागातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये बारा गुरे बांधून ठेवल्याचे दिसले. पोलिसांनी गुरांना वैद्यकीय उपचारासाठी चाळीसगाव रोड जवळील गौ शाळेत जमा करण्यात आले आहे. या गुरांची किंमत अंदाजे ७० ते ८० हजार रुपये आहे.

दोन दिवसांपूर्वी आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी वडजाई रोडवरील गोदामात कत्तलीसाठी गुरांना आणून ठेवल्या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चार गायीसह दोन जिवंत बैल तसेच मास मोजण्यासाठी लागणारा वजनकाटा, सुरा जप्त केला होता.