धूम स्टाईलने सोनसाखळी लांबवली ; परिसरातील तिसरी घटना

धुळे: पोलीसनामा ऑनलाईन – धुळे शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीचा प्रकार समोर आला आहे. शहरातील देवपुर परिसरात चोरट्यांनी धूम स्टाईलने एका महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकामारून चोरून नेली. या परिसरात सोनसाखळी चोर सक्रिय झाले असून याच परिसरात यापूर्वी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, देवपुरातील चंद्रोदय कॉलनीत महिलेच्या पाठिवर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी थाप मारून गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची 16 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली. या परिसातील ही तिसरी घटना असून परिसरात सोनसाखळी चोर सक्रिय झाल्याची चर्चा आहे. सोनसाखळी चोरट्यांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असताना मात्र पोलिसांची बघ्याची भुमिका दिसून येत आहे. या परिसरात चोरटे मस्त तर पोलीस सुस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पश्चिम देवपुर पोलीस करीत आहेत.

लग्नासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर भरदिवसा चोरट्यांचा डल्ला

धुळे: लग्न समारंभासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मरून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी 68 हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना चाळीसगाव रोडवरील सार्वजनिक हॉस्पिटल मागे घडली.
सैय्यद मोबीन अली सय्यद बुरहान अली यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चालक म्हणून काम करतात. ते नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील खोलीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्य़ादी हे रात्री घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तेजाळे करीत आहेत.