खडसेंची राष्ट्रवादीत एन्ट्री झाल्यानंतर अनिल गोटे प्रचंड आशावादी, केलं भाजपवासी कार्यकर्त्यांना परतण्याचं आवाहन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि भाजप ( BJP) नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) प्रवेश केला. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे ( Anil Gote) यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. गोटे यांनी देखील वर्षभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता हे दोन्ही नेते उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीसाठी चांगले दिवस आणणार कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीमध्ये कामाला सुरुवात केली आहे. सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. गोटे यांनी याविषयी बोलताना सध्या माझ्या संपर्कात भाजपचे 16 नगरसेवक आहेत आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत सध्या तरी काहीच हालचाली आम्ही करणार नाही. आदेश आला की 24 तासात चमत्कार दिसेल, असे गोटे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले.

काय आहे अनिल गोटे यांचे परिपत्रक
अनिल गोटे यांनी या पत्रकात एकनाथ खडसे आणि अनिल गोटे यांच्या एकत्रित येण्याने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे.धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता किती जुने कार्यकर्ते पक्षात परत येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.