‘भटके-विमुक्त’ हक्क परिषद जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा धुळे आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सामाजिक सत्कार व जिल्हास्तरीय मेळावा देवपूर दत्त मंदिर चौकातील श्री स्वामीनारायण मंदिर रस्त्यावरील खान्देश दशनाम गोसावी समाज कार्यालयात पार पडला.

नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

उद्घाटनपर भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सांगितले की, समाजासाठी सगळ्यांनी एकत्र यावे. मी ज्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार घेतला त्याच दिवशी प्रथमतः तांड्या वस्तीत काय सुधारणा झाली याबाबत चौकशी केली. समाजाने शिक्षणाची कास धरली पाहिजे. समाजातील लोकांनी अन्नातील एक घास तसेच कामातील एक तास समाजाच्या कार्यासाठी दिला पाहिजे. मानपान व मतभेद न करता सगळ्यांनी एकत्र आले तर चांगले कार्य समाजाच्या हिताचे करू शकतो. तसेच स्वतःची ओळख लपवू नका चांगले कार्य करा, विचार मोठे ठेवा, उदात्त हेतू ठेवा, माझ्याकडून मी समाजासाठी सर्वतोपरी मदत करेन, असे प्रतिपादन तुषार रंधे यांनी केले.

सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.