TikTok वर गावठी कट्टासोबत व्हिडीओ बनविणार्‍या तरुणावर FIR दाखल, 2 अग्नीशस्त्रे आणि 3 काडतुसं जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  टिक टॉकवर हातात गावठी कट्टा घेऊन फिल्मी स्टाईल डायलॉगबाजी करणे एका तरुणाला चांगलच महागात पडले आहे. तसेच त्याच्या दोन मित्रांनाही चांगलाच धडा पोलिसांनी शिकविला आहे. या कारवाईत पोलिसांना दोन गावठी कट्टा आणि तीन काडतुसं जप्त केली असून दोन्ही पिस्तूलची किंमत एकूण 71 हजार 500 रूपये इतकी आहे. या तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

धुळे शहरातील भीमनगर परिसरात राहणार्‍या दीपक शिरसाट याने टिक टॉकवर गावठी कट्टा हातात घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तोच व्हिडीओ पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागला. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कारवाईचे आदेश दिले.

यावेळी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला लगेच अटक केलीे. विशेष म्हणजे आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य दोन मित्र पंकज परशराम जिसेजा आणि अभय दिलीप अमृतसागर यांचीही नावे सांगितली. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन अभयकडून पुन्हा एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

दरम्यान, या तिन्ही आरोपींनी ही गावठी पिस्तूल कुठून आणले आणि या माध्यमातून त्यांनी काही गुन्हे केले आहेत का? याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.