धुळे : कोराना व्हायरस अफवेमुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांचे मोठे नुकसान, शासनाकडे मदतीसाठी साकडं

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चीन येथून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसच्या होणाऱ्या अपप्रचारमुळे, पोल्ट्री उद्योगाचा कोणताही दुरान्वये संबंध नसताना किंवा कोंबडीचे मांस खाल्ल्याने विषाणूंची लागण होते याचे पुरावे नसताना कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे कोंबडीचे मांस हे विक्री होत नाही. त्यामुळे शेडमध्ये असलेला माल तसाच पडून आहे. अगोदरच धुळे जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय नाही. शेतीसाठी पुरेसे पाणी नाही. शेतीला जोड धंदा नाही. अनेक बेरोजगार युवकांनी बँकेतून कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु व्हायरसच्या अफवेमुळे हा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात आलाय. बँकेत भरायला पैसे नाहीत.

पोल्ट्री व्यवसायिकांना आपला उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. सर्व पोल्ट्री व्यवसाय इथे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रति शंभर रुपये नुकसान भरपाई मिळावी व तूर्तास सहा महिने कर्जाचे हप्ते पुढे ढकलावे याकरता आज शहरातील सर्व पोल्ट्री व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. निदर्शने करीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले व या संकटापासून आम्हाला वाचवा असे साकडे घातले.

लोकसंग्राम पक्षाचे नेते दिलीप साळुंखे यांच्या नेतृत्वात पोल्ट्री व्यवसायिकांनी आर्थिक नुकसान भरपाई मिळावी याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून व्यवसायिकांवर आलेल्या संकटाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.