धक्कादायक ! इथं माणुसकी संपली ?, मालेगावच्या ‘कोरोना’ग्रस्तांना उपचारासाठी आणण्यास धुळेकरांचा विरोध

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरातील विविध शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संबंधितांना उपचारासाठी विविध शहरातील रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. दुसरीकडे मात्र, मालेगांव शहरातील करोना रुग्ण उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आणण्यास येथील सर्वपक्षीय राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

धुळ्यातील सर्वोपचार रुग्णालयात मुख्य कोरोना कक्ष कार्यान्वित आहे. रुग्णालयातील डॉक्टरही कोरोनामुळे बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण कर्मचारी तणावात काम करीत आहेत. अशा परिस्थितीत मालेगावातील रुग्ण धुळ्यात हलविण्यास विरोध करण्यात आला आहे. दुपारी सर्व निवासी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी निदर्शने केली. महाविद्यालयाच्या तांत्रिक समितीसमोर या आंदोलक डॉक्टरांनी आणि कर्मचार्‍यांच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे यांनी आंदोलक डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. शेजवळ हेही उपस्थित होते. प्रशासन आणि राज्य शासनाला आपली भूमिका आम्ही कळवू. रूग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, साधन-सुविधांची कमतरता याबद्दलही सांगू. सर्वोपचार रुग्णालयावर भार टाकण्यापेक्षा इतर व्यवस्था कशी करता येईल, याबद्दल शासनाने निर्णय घ्यावेत, अशी भूमिका मांडली जाईल असे डॉ. रामराजे यांनी सांगितले.