Drug Case : दिया मिर्झाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवालास NCB नं केली अटक, बॉलीवूडमध्ये खळबळ

पोलीसनामा ऑनलाईनः अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर सिनेसृष्टीतील ड्रग्सचे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत या प्रकरणी सिलिब्रेटी आणि नामांकीत व्यक्तींची चौकशी झाली आहे. यात काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांची नावे समोर आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. 5) या दोघांना एनसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

राहिला आणि करण सजनानी या दोघांकडे काही दिवसापूर्वी 200 किलो गांजा सापडला होता. त्यामुळे त्यांना 30 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबईच्या एस्प्लेनेट कोर्टाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर आता एनसीबीने राहिला फर्निचरवाला आणि व्यावसायिक करण सजनानी यांना अटक केली आहे.

चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबीने अंमली पदार्थ तस्करांविरोधात कारवाई सुरु केली आहे. नुकतेच एनसीबीने सुशांत सिंग राजपूतचा जवळचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्ट ऋषिकेश पवार याला अटक केली आहे. ऋषिकेश हा सुशांतच्या ड्रीम टीम प्रोजेक्टचा मॅनेजर होता. आतापर्यंत एनसीबीकडून ड्रग प्रकरणात फिल्म अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह 25 नामांकित व्यक्तींना अटक केली असून डझनभर नामांकित व्यक्तींची चौकशी केली आहे. तर गेल्या आठवड्यात एनसीबीने दाऊद इब्राहिमचे खास परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांना अटक केली होती.