प्रियांका चतुर्वेदी यांच्या शिवसेना प्रवेशामागे प्रशांत किशोर ? ; मिळू शकते राज्यसभेचे तिकीट

नवीन दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला राजीनामा देत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस सोडल्यानंतर लागेचच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावरून चर्चेला उधाण आले आहे. प्रियांका यांच्या शिवसेना प्रवेशाच्या मागे जेडीयूचे नेते प्रशांत किशोर असल्याचे बोलले जात आहे. चतुर्वेदी यांच्या शिवसेना प्रवेशामागे प्रशांत किशोर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात सुरु आहेत.

असे देखील सांगण्यात येत आहे की, शिवसेना पुढील वर्षी प्रियांका यांना राज्यसभेचे तिकीट देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने याबाबत प्रियांका यांना आश्वासन दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘ शिवसेना राष्ट्राच्या राजधानीत एका शिष्ट चेहऱ्याच्या शोधात होती. ठाकरे यांच्या पक्षाची प्रतिमा बदलण्याची आदित्य ठाकरे यांची रणनीती आहे. शिवसेना महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रीय स्तरावर देखील आपली प्रतिमा बदलण्याच्या तयारीत आहे’. असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसवर प्रियांका नाराज

प्रियांका यांची काँग्रेस पक्षावर नाराजी होती. त्यांनी शुक्रवारची झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसबद्दलची नाराजी व्यक्त केली त्या म्हणाल्या ” ‘लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडला, असे म्हणता येणार नाही. मी १० वर्षे काँग्रेसची नि:स्वार्थीपणे सेवा केली. आता मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईकर असल्याने मला शिवसेनेबाबत पूर्वीपासून आत्मियता वाटत आली आहे”, असे प्रियांका चतुर्वेदींनी स्पष्ट केले.