भाजपाला पाठिंबा देऊ नका, असे सांगितले नव्हते : आ. संग्राम जगताप  

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपाला पाठिंबा देऊ नका, असा निरोप मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला नव्हता. त्यांच्याशी माझे याबाबत बोलणे झालेले नव्हते, असे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व एका अपक्ष अशी १९ जणांची आम्ही गटनोंदणी केली होती. भाजपला पाठिंबा देण्याचा आमचा निर्णय ऐनवेळचा होता. नगरसेवकांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांशी माझी कुठलीही चर्चा झालेली नव्हती. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अथवा इतर नेत्यांनी भाजपाला पाठिंबा देऊ नका, असा निरोप मला दिलेला नव्हता.
नगरसेवकांशी चर्चा करून भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायला वेळ मिळाली नाही. मी भाजपाचे शहरातील नगरसेवक व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय कळविला. आमचे नगरसेवक जास्त असल्याने ते आम्हाला महापौरपदही द्यायला तयार होते. परंतु, आम्ही ते नाकारून बाहेरून पाठिंबा दिला. भाजपचा महापौर केल्यास आम्ही शहरात मोठ्या प्रमाणावर निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात शहराचा विकास ठप्प झाला होता. आता भाजपाचे सरकार असल्याने शहराच्या विकासासाठी निधी मिळेल, या अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.
पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही. काल महापौरपदाच्या निवडणुकीत घेतलेल्या निर्णयाबाबत हायकमांडशी चर्चा करून हा निर्णय का घेतला, हे सांगितले जाईल. नगरसेवकांनाही नोटिसा प्राप्त झाल्यानंतर ते त्यांचे खुलासे पक्षाला देतील. आम्ही आमची बाजू पक्षाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. निवडणूककाळात ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याशी अथवा जिल्हाध्यक्ष फाळके यांच्याशी शहरातील महापालिका निवडणुकीबाबत कुठलीही चर्चा झालेली नव्हती. निवडणुकीत कळमकर यांची भेटही झाली नाही, असेही जगताप म्हणाले.

महाजन महत्वाचे की पक्षश्रेष्ठी ?

 

ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.  ऐनवेळी निर्णय घेतल्याने पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करायला वेळ मिळाला नाही. म्हणून आम्ही घेतलेला निर्णय त्यांना कळविता आला नाही, असे पत्रकार परिषदेत सांगितले. जगताप यांना जलसंपदामंत्री महाजन यांच्याशी चर्चा करायला वेळ मिळतो. परंतु, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायला किंवा त्यांना सांगायलाही वेळ मिळत नाही. म्हणजे पक्षश्रेष्ठी यांच्यापेक्षा जगताप यांना महाजन महत्वाचे वाटले का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like