आयकर विभागाचा ‘ई-मेल’ तुम्हालाही प्राप्त झाला आहे का ? दुर्लक्ष करू नका ; अन्यथा होऊ शकतं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या वेळी आयकर विभागा (Income Tax Department) ने नियमित अंतराने करदात्यांना कर परतावा (Tax Refund) थेट बँक खात्यात ट्रान्सफर करून मोठा दिलासा दिला. यावेळी विभागातून वारंवार ई-मेलद्वारे करदात्यांना (Taxpayers) माहिती दिली जात आहे. आता विभागाने ट्विट केले आहे की, आमच्याकडून पाठविलेल्या कोणत्याही ई-मेलकडे दुर्लक्ष करू नका. प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की, आमच्या बाजूने जर एखादा ई-मेल पाठवला गेला तर तो महत्त्वाचाच असेल.

विभागाने अधिकृत मेल आयडी शेअर केले
करदात्यांसमोर सर्वांत मोठी समस्या ही आहे की, विभागाने पाठविलेले कोणते ई-मेल योग्य आहेत आणि कोणते फसवणूक करणाऱ्याने पाठविले आहेत. प्राप्तिकर विभागाने करदात्यांची ही समस्या समजून घेत काही वेळापूर्वी माहिती शेअर केली होती. विभागाने ई-मेल पाठविला होता, त्यामध्ये सर्व अधिकृत ई-मेल आयडी, एसएमएस सेंडर आयडी आणि वेबसाइटची माहिती दिली होती. विभागाने ई-मेलमध्ये लिहिले होते की या लिस्टशिवाय इतर कोणत्याही आयडीवरून मेल किंवा मेसेज आल्यावर त्यास ओपन करू नका. कोणत्याही प्रकारची माहितीही शेअर करू नका. विभागाने म्हटले होते की, क्लिक करण्यापूर्वी नेहमी तपासा. केवळ या स्रोतांवर विश्वास ठेवा.

प्राप्तिकर विभागाचे अधिकृत ई-मेल आयडी
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या यादीमध्ये @incometax.gov.in, @incometaxindiaefiling.gov.in, @tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @insight.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com यांचा समावेश आहे. या आयडीवरील ई-मेल किंवा मेसेजलाच उत्तर द्या असे विभागाने म्हटले आहे. विभागाने पाठविलेल्या संदेशांचे सेंडर आयडी ITDEPT, ITDEFL, TDSCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN हे आहेत.

विभागाने अधिकृत वेबसाइट्सची दिली माहिती
प्राप्तिकर विभागाची अधिकृत वेबसाइट www.incometaxindia.gov.in आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी विभागाची अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in आहे. याशिवाय टीडीएस (TDS) संबंधित माहितीसाठी www.tdscpc.gov.in वर संपर्क साधता येईल. याशिवाय आपण अनुपालन व रिपोर्टिंगसाठी www.insight.gov.in वर लॉग इन करू शकता. याशिवाय, करदाता www.nsdl.co.in आणि www.utiitsl.com वर पॅनकार्डशी संबंधित सेवांसाठी लॉग इन करू शकतात.