आमिर खान आजही विसरू शकला नाही सनी देओलचे ‘ते’ शब्द, म्हणून सोडला होता ‘डर’ सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ही अशी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये अनेक नाती तुटतात आणि जुळतात. कधी कोणाच्या नात्यात काय होईल हे सांगू शकत नाही. आता आमिर खानच पहा ना. काही काळापुर्वी आमिर खान आणि सनी देओल एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण एका चित्रपटामुळे त्यांच्यात फुट पडली. पुढे या दोघांनी चित्रपटात काम केले नाही आणि आजही ते एकत्र दिसत नाही. झाले असे की, 90 च्या दशकात यश चोप्रा ‘डर’ चित्रपटावर काम करत होते. फार कमी लोकांना माहित असेल की, या चित्रपटात शाहरुख खान नाही तर आमिर खान यश चोप्रा याची पहिली पसंत होता. यश चोप्रा यांनी सर्वप्रथम चित्रपटाची कथा आमिरला सांगितली होती. आमिरला चित्रपटाची कथा आवडली देखील होती पण क्लायमॅक्समध्ये मात्र त्याने एक छोटासा बदल सुचवला होता.

तो यश चोप्राला म्हणाला की, ‘मी या चित्रपटात काम करेल पण मला चित्रपटाच्या क्लायमेक्समध्ये छोटासा बदल हवा आहे.’ यश चोप्रा यांनी आमिर खानला क्लायमेक्स सांगितला होता तेव्हा त्यांनी संपूर्ण सीनही त्याच्यापुढे उभा केला होता. सीन असा होता की, सनी देओल आणि आमिर खान दोघे एकमेकांच्या समोरासमोर येतील. आमिर खान सनी देओलला दोन वेळा सुरा मारेल. त्यानंतर तो जुहीला दूर समुद्रात एका बोटीवर घेऊन जाईल. त्यानंतर सनी देओलला जाग येईल, तो त्याच्या शरीरामध्ये मारलेला सुरा काढून जखमेवर कापड बांधून बोटीवर जाऊन आमिरला मारेल, असा क्लायमेक्स सीन होता. ‘डर’ चित्रपटात अगदी असाच सीन दाखवला आहे. पण क्लायमेक्सवर आमिर थोडा ना खुश होता. सनी देओल सुऱ्याने त्याला मारेल ते आमिरला पटले नाही. हे वास्तवाला धरून नाही असे आमिरचे मत होते.

आमिरचे म्हणणे यश यांनी ऐकून घेतल्यावर त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला. यावर मी सनी देओलशी चर्चा करतो त्यानंतर आपण योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी आमिरला सांगितले. त्यावेळी सनी देओल यशाच्या शिखरावर होता एक सुपरस्टार होता यश चोप्रा यांनी आमिरची शंका सनीला सांगितली. दोनवेळा सुरा मारल्यावर एवढी शक्ती हिरोकडे कशी असू शकते, तो बोटीवर येऊन विलनला मारेल ? आमिरच्या मनातील हा प्रश्न त्याने सनीला सांगितला. यावर सनी देओल जोरजोरात हसू लागला. चित्रपटातच काय तर खऱ्या आयुष्यात सुद्धा आमिर खानने मला दोनवेळा सूरा भोसकल्यानंतरही मी उठेल आणि त्याला मारेल, असे तो हसत हसत म्हणाला.

आमिरला ही गोष्ट कळाल्यानंतर तो खूप चिडला. सनीने अशी त्याची खिल्ली उडवलेली हे आमिरच्या जिव्हारी लागले त्यामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर पुन्हा कधीच सनीसोबत काम न करण्याची त्याने शपथ घेतली. (अर्थात फक्त एकदा राज कुमार संतोषीच्या शब्दाला मान देऊन आमिर खानने सनी देओलच्या ‘दामिनी’ चित्रपटात एक गाणे केले. परंतू त्या गाण्यात सुद्धा ते एकदाही एका फ्रेममध्ये एकत्र आले नाही. आमिर खानचे गाणे चित्रपटाच्या सुरुवातीला होते तर सनी देओलची चित्रपटातील एंन्ट्री इंटरव्हलच्या जरा आधी दाखवण्यात आली.)

आमिरच्या नकारानंतर या चित्रपटात काम करण्याची संधी शाहरुख खानला मिळाली. त्याकाळी शाहरुख नवीन होता, त्याला चित्रपटाची गरज होती. त्यामुळे त्याने भूमिका कोणत्याही बदलांशिवाय स्विकारली. शाहरुखचा अभिनय पाहून यश इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्या चित्रपटात शाहरुखला आणखी वजन देण्याचे ठरवले. मग काय, चित्रपट रिलीज होण्याआधी आमिर दुखावला अन् चित्रपट रिलीज झाल्यावर सनीही दुखावला. एकीकडे आमिरने सनीसोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली. दुसरीकडे सनीने यशराज सोबत कधीच चित्रपट न करण्याचा पण केला. ‘डर’ चित्रपटाने आमिर आणि सनीला नाराज केले आणि शाहरुख यश चोप्रा यांचा आवडता अभिनेता बनला.