कंगनानं शेअर केली आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. कंगना अनेकदा तिच्या आठवणी आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असते. कंगानं तिला मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारासदर्भातील एक आठवण शेअर केली आहे.

कंगनाला आजवर 3 राष्ट्रीय पुरस्कार, 4 फिल्मफेअर आणि पद्मश्री अशा अनेक मोठ्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. परंतु जेव्हा ती पहिला राष्ट्रीय पुरस्कार स्विकारत होती तेव्हा तिच्याकडे नवीन ड्रेस घेण्यसाठी पैसे नव्हते असं ती म्हणाली आहे. कंगनानं यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

कंगनानं ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती लिहिते की, माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार. या सोहळ्याच्या अनेक आठवणी आहेत. कमी वयात हा पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेत्रींपैकी मी एक होते. त्यातच महिला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्विकारणं ही एक फार मोठी गोष्ट आहे.

पुढं सांगताना कंगना लिहिते की, मी परिधान केलेला ड्रेस मी स्वत: डिझाईन केला आहे. त्यावेळी एक नवीन ड्रेस घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. हा ड्रेस इतकाही वाईट दिसत नाही, होय ना ? असंही ती म्हणाली आहे.

फॅशन या फेमस सिनेमासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला होता.

कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. काही चाहते तिचं कौतुकही करत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.