देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि मॅक्सचा भीषण अपघात ; नववधूसह सासू ठार

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन परतत असताना ट्रक आणि मॅक्सचा अपघात झाल्याने तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात मारेगावजवळ मध्यरात्री २ च्या सुमारास झाला. मृतांमध्ये नववधूसह सासूचा समावेश आहे.

सासू लक्ष्मीबाई उपरे (वय ६० वर्षे), सानिका किसन गोपाळे (वय २० वर्षे), या जागीच ठार झाल्या. तर नववधू साक्षी देवीदास उपरे (वय १८ वर्षे) हिचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर राजनंदिनी सुनील पवार(वय ४), साधना कोंडबा गोंधरे (वय ३५), पुजा शंकर उपरे (वय २०), चंपाबाई बाबा पेंडलेवार (वय ७०) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपरे कुटुंबिय हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी आहेत. ते लग्नानंतर चंद्रपूर येथे महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी दर्शन घेऊन परतत असताना मारेगाव येथील तुळशीराम रेस्टॉरंटजवळ यवतमाळकडून चंद्रपुरकडे जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने टाटा मॅक्स गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मॅक्स गाडीने रस्त्यावरून तीन वेळा पलटी घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या खडड्यात पडली. त्यावेळी दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर नववधूचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना मृत्यू झाला.