फुटबॉलचा ‘जादूगार’ डिएगो मॅरेडोना काळाच्या पडद्याआड, श्रद्धांजली वाहताना दिग्गज झाले ‘भावुक’

पोलीसनामा ऑनलाइन – अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मॅरेडोना यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्याजवळील सदस्यांनी वृत्तसंस्थांना दिली आहे. मॅरेडोना यांच्या निधनामुळे समस्त क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक दिग्गज श्रद्धांजली वाहताना भावुक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत मॅरेडोना यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डिएगो मॅराडोना हे एक जादूगार होते. ज्यांनी फुटबॉल खेळ अप्रतिम बनवला होता. त्यांच्या कुटुंबीयांना,चाहत्यांना माझं प्रेम आणि संवेदना, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

१९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं. काही दिवसांपूर्वी मॅरेडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅरेडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या होत्या.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील मॅरेडोना यांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांनी एक ट्विट केलं असून, क्रीडा आणि फुटबॉल जगतातील एका महान खेळाडूला आज आपण गमावले आहे. रेस्ट इन पीस मॅरेडोना ! तुमची कायम आठवण येईल असे म्हटले आहे.

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही शोक व्यक्त केला आहे. मॅरेडोना यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!’

३० ऑक्टोबरला केला होता ६० वा वाढदिवस
ड्रग्ज सेवन, दारू यामुळे मॅरेडोन काही काळ फुटबॉलपासून दूर होते. मात्र, या सर्वांवर मात करत त्यांनी २००८ साली अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दमदार पुनरागमन केलं. प्रशिक्षणाचा फारसा अनुभव नसतानाही मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाच्या संघाला प्रशिक्षण देताना आपला ठसा उमटवला होता. नुकताच म्हणजे ३० ऑक्टोबरला त्यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला होता.