मुंबई आणि दिल्लीत डिझेलच्या दरात मोठी वाढ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या महासंकटात महागाईमुळे सर्वासामान्यांचे कंबरडं मोडले आहे. लॉकडाऊनमुळे वाढलेल्या भाज्या आणि किराणाचे भाव आणि महागाईचा मोठा फटका बसत आहे. असे असतानाच आता इंधर दरवाढीच्या झळाही बसताना दिसत आहे. सलग दुसर्‍या दिवशी मुंबई आणि दिल्लीत डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल पाठोपाठ डिझेलने 80 रुपयांची पातळी ओलांडली आहे. जुलै महिन्यात डिझेलच्या दरात आतापर्यंत 1.55 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलच्या दराचा मात्र भडका उडाला आहे.

दिल्लीत डिझेल 80.11 आणि पेट्रोल 81.79 रुपये प्रति लिटर आजचा दर आहे. तर मुंबईत लिटरमागे ग्राहकांना पेट्रोलसाठी 87.19 तर डिझेलसाठी 80.11 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 82.10 तर डिझेल 77.04 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत. पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होतो. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. दरम्यान, मागील काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ करण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिंक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.