आनंदवनातील मतभेदांवर लवकरच तोडगा : डॉ. प्रकाश आमटे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आमटे कुटुंबातील मतभेद दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापतरी त्यात मला यश आलेले नाही. लवकरच सर्व काही सुरळीत होईल आणि सर्वमान्य तोडगा निघेल, असा विश्वास प्रसिद्ध समाजसेवक व महारोगी सेवा समितीचे सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केला.

आनंदवनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आज समितीच्या विश्वस्त मंडळाची वेब बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वादाच्या निमित्ताने या संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी एका विशिष्ट विचारसरणीचे लोक सक्रिय झाल्याचे लक्षात येताच सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ही संस्था सुरळीत चालणे राज्याच्या हिताचे असल्याने त्यावर प्रशासक नेमण्यासंदर्भात मंत्रालयात चर्चा सुरू झाली आहे. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आनंदवन आणि हेमलकसा हे प्रकल्प सुरू झाले. बाबांच्या कामावर याआधीही अनेकदा टीका झाली, पण त्यांनी कधीही त्या टीकेचा प्रतिवाद केला नाही वा प्रतिक्रियासुद्धा दिली नाही. प्रतिवाद करण्यापेक्षा आपले कामच बोलले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. तीच शिकवण आम्ही सर्व आमटे कुटुंबीयांनी अंगीकारली आहे. त्यामुळे टीकेकडे लक्ष न देता काम करत राहणे यालाच आम्ही प्राधान्य देतो. संस्थेवर आता संकट आले असले तरी त्यातून आम्ही नक्की बाहेर पडू, असा आशावाद आमटे यांनी व्यक्त केला. दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शासनाला हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नका, असा इशारा दिल्यानंतर अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतर आता शासनदरबारीही हालचाली सुरू झाल्या आहेत.