MPSC च्या निर्णयामुळं कोणाला झाला ‘आनंद’ तर कुणी ‘नाराज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Central Public Service Commission) धर्तीवर राज्य सेवा आयोगाने (State Service Commission) परीक्षा देण्यासाठी मर्यादा लागू केली. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गाटातून फक्त 9 वेळा परीक्षा देता येणार आहे. राज्य सेवा आयोगाने (State Service Commission) बुधवारी (दि.30) निर्णय जाहीर केल्यानंतर काही उमेदवारांनी याचे स्वागत केले तर काहींनी याबाबत नाराजी व्यक्त करत या निर्णयामुळे गोंधळ वाढला असल्याचे सांगितले.

महेश बढे हे काही वर्षापूर्वी स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते मात्र, आता ते परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी काम करतात. आयोगाच्या निर्णयांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निर्णय उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबासाठी हिताचा आहे. अनेक उमेदवार दहा-दहा वर्षे परीक्षेसाठी थांबतात. परंतु या निर्णयासंदर्भात दोन मत प्रवाह दिसत असले तरी हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका उमेदवाराने सांगितले, मुळात हा निर्णय खूप आधी येणे गरजेचे होते. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या निर्णयामुळे अधिक गंभीरपणे अभ्यास करतील, अशी अपेक्षा आहे. तसेच त्यांच्या उमेदीची वर्षे वाचवु शकतील. परंतु हा निर्णय राबवताना यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना संधीमध्ये मोजू नये. करण अमर्याद वेळ असल्याने काही जणांनी अभ्यास न करता परीक्षा दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय न होता याची अंमलबजावणी करता येईल अशी तरतूद यामध्ये व्हावी.

स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे भोळे यांनी सांगितले की, राज्य आयोगाच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील समजातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याशिवाय आयोगाच्या परीक्षा कधी होणार, परीक्षेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा, रिक्त पदे असे अनेक विष आणि त्यासंबंधीचे निर्णय प्रलंबित आहेत. असे असताना आयोगाने विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याच्या संधीची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घाई-घाईने घेण्याची गरज नव्हती, यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.