विनयभंग प्रकरण : DIG निशिकांत मोरेंवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विनयभंग प्रकरणात पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक निशिकांत मोरे यांचा आज पनवेल सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटळून लावला आहे. त्यातच आता त्यांना डीआयजी पदावरून निलंबित करण्यात आले आहे. राज्याच्या गृहविभागाने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन तरुणीचा विनयभंग आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप मोरे यांच्यावर आहे. आज दिवसात या प्रकरणात मोरे यांना बसलेला हा दुसरा झटका आहे.

मुलीच्या विनयभंगप्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना आज निलंबीत करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचा आदेश गृहविभागामार्फत निर्गमित करण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृहविभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/