‘हे’ कार्ड असणार्‍यांनाच ‘कोरोना’ची लस दिली जाणार ? PM मोदींनी दिले महत्वाचे संकेत

पोलीसनामा ऑनलाइन – भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ७६ लाखांच्या आसपास पोहचली आहे. अशात लसीकरणासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की, देशातील प्रत्येक नागरिकास राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानातंर्गत हेल्थ कार्ड देण्यात येईल. आता २ महिन्यांनी पंतप्रधान मोदींनी पुन्हा ‘लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल हेल्थ आयडी वापरला जाईल’ असे संकेत दिले आहेत.

लसीकरणासाठी डिजिटल कार्ड महत्वाचे

‘ग्रॅन्ड चॅलेंज’च्या वार्षिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोरोनाची लस तयार करण्याच्या बाबत भारत पुढे असून, काही लशींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. डिजिटल हेल्थ कार्डसोबत डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एका वितरण प्रणालीवर काम केले जाईल. त्यामार्फत नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. भारतातील नागिरकांनी विविधतेने नेहमीच सर्वांना आकर्षिक केलं आहे. आपला देश अमेरिकेच्या लोकसंख्येच्या चौपट आहे. आपली राज्ये युरोपियन देशांइतकी आहे. भारताचा कोरोना मृत्युतर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. दुसरीकडे दररोज नवीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. तद्वतच भारताचा रिकव्हरी रेट ८८ टक्के झाला आहे.”

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्रदिनी बोलताना हेल्थ कार्डबाबत माहिती सांगितली होती. ते म्हणाले होते की, “प्रत्येक भारतीय नागरिकास हेल्थ कार्ड दिले जाईल. हे कार्ड प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल. या कार्डमध्ये तुमची प्रत्येक चाचणी, आजार, कोणत्या डॉक्टरांकडून कोणते औषध घेतले आहे, त्याचे उपचार केव्हा घेतले, त्याचे अहवाल काय आले या सर्व बाबींचा समावेश असेल. डॉक्टरांच्या वेळ घेणं, पैसे जमा करणे, दवाखान्यात प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी गर्दी असो, या सर्व समस्यांपासून लांब राहण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची मदत होईल. तसेच प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल.”