Google Pay, Paytm, PhonePe वापरकर्त्यांसाठी 1 जानेवारीपासून नवा नियम लागू

पोलीसनामा ऑनलाईन : गुगल पे (Google Pay), पेटीएम (Paytm) आणि फोन-पे सह (PhonePe) थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून UPI (Unified Payment Interface) पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National Payments Corporation of India) थर्ड पार्टी ऍप प्रोव्हाडर्सवर 1 जानेवारी 2021 पासून 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. NPCI ने थर्ड पार्टी अ‍ॅप्सचे एकाधिकार संपुष्ठात आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोणत्याही पेमेंट अ‍ॅपची यूपीआय (UPI) व्यवहारांमध्ये मक्तेदारी राहणार नाही.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक पत्रक जारी करत सांगितले आहे की, थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हाडर्सवर (TPAP) 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप मक्तेदारी रोखण्यासाठी आणि त्यांच्या आकारानुसार मिळणारे विशेष फायदे रोखण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रत्येक महिन्याला जवळपास 200 कोटी UPI ट्रान्झेक्शन होत असून हे UPI ट्रान्झेक्शन विविध पेमेंट्स अ‍ॅप्सद्वारे होतात. आगामी काळात देशात UPI ट्रान्झेक्शनचा आकडा आणखी वाढणार आहे. दरम्यान, UPI ट्रान्झेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे NPCI थर्ड पार्टी ऍपच्या ट्रान्झेक्शनवर लगाम लावण्याच्या प्रयत्नात आहे.1 जानेवारीनंतर ऍप, टोटल वॉल्यूमच्या अधिकाधिक 30 टक्केच ट्रान्झेक्शन करू शकतील. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोन-पे ने सांगतिले की यामुळे त्यांच्या ग्राहकांना ट्रान्झेक्शनमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही.