जगातील प्रत्येक हिंदू प्रभु श्रीरामांना देवाचं रूप मानतो, तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा : दिग्विजय सिंग

भोपाळ : वृत्तसंस्था – राम मंदिराच्या उभारणीवरून काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर टीका केली आहे. प्रभू रामचंद्र हे सर्वांचे आहेत. त्यांचे मंदिर हिंदू धर्मगुरुंनी बांधायला हवं. राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या संघटनांनी यापासून दूर रहायला पाहिजे. राम मंदिर उभारणीची जबाबदारी रामालय ट्रस्टला द्यावी असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.

राम मंदिर उभारणीवरून दिग्विजय सिंह यांनी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर निशाणा साधला आहे. राम मंदिराची उभारणी ही हिंदू धर्मगुरुंनी करावी. भगवान श्रीराम हे सर्वांचेच असून राम मंदिर उभारण्याची जबाबदारी रामालय ट्रस्टला देण्याची मागणी त्यांनी ट्विट द्वारे केली आहे. रामालय ट्रस्टमध्ये सर्व शंकराचार्य आणि रामानंदी संप्रदायाशी संबंधित आखाडा परिषदेचे सदस्य आहेत. तसेच जगद्गुरु स्वामी स्वरुपानंदजी सर्वात वरिष्ठ असल्याने तेच अध्यक्ष आहेत. रामालय ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर उभारावे, असेही दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.

दिग्विजय सिंग यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारी तिजोरीतील पैसा वापरून राम मंदिराची उभारणी नको. जगभरातील हिंदू प्रभू रामचंद्रांना देवाचा अवतार मानतात. तेच लोक मंदिराच्या उभारणीसाठी मदत करतील. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारणीसाठी जे पैसे गोळा केले आहेत ते त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावेत. त्याचा वापर समजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी वापरावा, असे सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, राम मंदिर उभारण्याची जबाबदारी आमच्याकडे दिली तर आम्ही सरकारकडून मंदिर उभारणीसाठी पैसे घेणार नाही, लोकांच्या मदतीनेच हे राम मंदिर उभारले जाईल असे स्वामी स्वरुपानंद यांनी यापूर्वीच म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/