मिरज : महात्मा जोतीराव फुले स्मारकाची प्रचंड दुरवस्था; महापालिकेचे दुर्लक्ष

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली येथील मिरज तालुक्यातील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर असणारे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाची प्रचंड दुरवस्था झाली असून, सांगली महानगरपालिका प्रशासनाने या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे समजते.

स्मारक असणाऱ्या ठिकाणी स्मारकाची निगा राखली जात नाही, आणि तेथे स्वछताही होत नाही. जवळील गटारी, खोदकामातील कचरा, घाण पाणी येथे आणून टाकून विटंबना होत आहे. मात्र महापालिकेचे त्याकडे लक्ष दिसत नसल्याचे समोर आले आहे. तर, ऑल इंडिया पॅथर सेना, रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर यांनी दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीपूर्वी स्मारकाची स्वच्छता करावी अशी मागणी केली असून दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

दरम्यान, ४ मे १९८४ रोजी मिरज नगरपरिषदेने महात्मा जोतीराव फुले यांचे स्मारक बांधले. तर १९९८ रोजी पासून महानगरपालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून मात्र संबंधित राजकारण्यांनी महापुरुषांचा त्यागाचा इतिहास पायदळी तुडवत या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी या महापुरुषांचा स्मारकाच्या विटंबना प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून महापालिका आयुक्त, महापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महासचिव अमोल वेटम, जिल्हा अध्यक्ष स्वप्नील खांडेकर यांनी केली आहे.