ठेवीदारांना कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या दिलीप आपेटला पुण्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ठेवीदारांना जवळपास १० कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घालणाऱ्या शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा चेअरमन दिलीप आपेटला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांना जास्त व्याजाचे अमिष दाखवून दिलीप आपेटने अनेक ठेवीदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा बीडमध्ये दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलीप आपेट आपल्या कुटुंबासमवेत अनेक महिन्यांपासून फरार होता. काल त्याला बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb1c4170-a844-11e8-a4c2-551906dfa4c9′]

शुभ कल्याण मल्टीस्टेट बँकेच्या राज्यात आणि राज्याबाहेरही जवळपास शंभर शाखा होत्या. ज्या शाखांमधून जास्तीचे व्याजदर देण्याचं आमिष ठेवीदारांना दाखवलं होतं. मात्र ठेवीदारांनी जे पैसे गुंतवले ते त्यांना परत मिळालेच नाहीत. शिवाय दिलीप आपेटची खासगी मालकी असलेल्या शंभू महादेव साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊसाचे 55 कोटी रुपये थकीत रक्कम देणे बाकी आहे.

दिलीप आपेट आणि संचालकांवर बीड जिल्ह्यात एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. राज्यभरातही विविध ठिकाणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
बँकेचा संचालक गेली अनेक दिवस पोलिसांच्या हाती लागत नव्हता. कधी काळी भाजपचं काम करणाऱ्या दिलीप आपेट या व्यावसायिकाने बँकेच्या माध्यमातून लोकांना हा गंडा घातला. इतर बँकाच्या तुलनेत शुभकल्याण मल्टीस्टेट बँक ठेवीवर जास्त व्याजदर देण्याची ऑफर देत होती. याच भूलथापांना बळी पडून परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये नोकरी करुन निवृत्त झालेल्या शंकर राऊत यांनी आपल्याकडील पेन्शनचे आलेले सगळे 23 लाख रुपये या बँकेत फिक्स केले. सुरुवातीचे तीन-चार महिने व्याज मिळालं. मात्र पुन्हा या बँकेला टाळं लागलं जे अद्याप उघडलेलंच नाही. शंकर राऊतांसारखे अनेक गुंतवणूकदार फसले आहेत.