महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या, सर्वत्र खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल (वय-52) यांनी आज (शुक्रवार) दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर एका मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुंबई आऊटवर दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या आत्महत्येमागे नेमके समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेननासाठी पाठवून दिला असून तपास सरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दिलीप गुगल हे आपल्या शासकीय वाहनातून नागपूर रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी वाहन चालकाला मित्र येणार असल्याचे सांगून त्याला पार्किंगमध्ये थांबण्यास सांगितले. गुगल हे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मुंबईच्या बाजूने असलेल्या रेल्वे मार्गावर चालत गेले.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या पार्सल ऑफिसच्या थोडे पुढे जाऊन त्यांनी मालगाडीसमोर उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी आणि आरपीएफने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या खिशाची झडती घेतली असता पैसे, ओळखपत्र आणि मोबाइल सापडला. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी ओळख पत्राच्या आधारे महावितरणच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चालकाशी संपर्क साधून चौकशी केली. त्यावेळी त्याने साहेब रेल्वे स्थानकावर गेले आहेत. ते त्यांच्या मित्राची वाट पहात असल्याची माहिती दिली. महावितरण अधिकाऱ्यांनी पोलिसांना वाहन चालक रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने साहेब मित्र येणार असल्याने ते रेल्वे स्थानकात गेले असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गुगल हे काटोल मार्गावरील महावितरण कॉलनीत रहात होते. गुगल यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.