Home Ministry Dilip Walse Patil : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी (दि. 6) गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला आहे. आज मंत्रालयात वळसे- पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग प्रकरणी जो निर्णय दिला आहे त्याला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती वळसे- पाटील यांनी यावेळी दिली. तसेच कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल असेही ते म्हणाले.

पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील माध्यमांशी बोलत होते. मी आज पदभार स्वीकारला असून ही जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करेन. तसेच प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावल टाकणे आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे. त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणे, पोलीस हाऊसिंगसाठी घरे बांधणे आदी गोष्टी करायच्या असल्याचे ते म्हणाले. कोरोनामुळे पोलीस रस्त्यावर उतरुन काम करत आहेत. एप्रिलमध्ये गुडीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानची सुरुवात सारखे विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी आव्हान राहणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आभार मानले आहेत.