अंधुक प्रकाशात काम करणे मेंदूसाठी घातक

पोलीसनामा ऑनलाइन – रात्री वाचन अथमवा लिखाण काम करताना अंधुक प्रकाशात काम करणे डोळ्यांसाठी तसेच मेंदूसाठी धोकादायक आहे. यासंदर्भात मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशाधनात असे दिसून आले की, ज्या व्यक्ती अंधुक प्रकाशात सतत काम करतात त्यांच्या मेंदूच्या रचनेत बदल होतो. तसेच स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.

या संदर्भातील संशोधन हे हिप्पोकॅम्पस जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे संशोधन करताना मिशिगन स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक जोएल सोलर व त्यांच्या टीमने प्राण्यांवर हे संशोधन केले. प्राणी हे माणसांप्रमाणे सकाळी उठतात आणि रात्री झोपतात. या प्रयोगात सलग चार आठवडे प्राण्यांवर संशोधन कऱण्यात आले. काही प्राण्यांना रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकाशात ठेवण्यात आले तर काही प्राण्यांना अंधुक प्रकाशात ठेवण्यात आले.

संशोधनाच्या अखेरीस असे स्पष्ट झाले की, ज्या प्राण्यांना अंधुक प्रकाशात ठेवण्यात आले त्यांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पसची क्षमता तीस टक्क्यांनी कमी झाली होती. हिप्पोकॅम्पस हा मेंदूतील घटक विचार करण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असतो. संशोधनात असे दिसून आले की, अंधुक प्रकाशामुळे माणसाची स्मरणशक्ती कमी होतेच शिवाय मेंदूची संरचनाही बदलली जाते. अंधुक प्रकाशामुळे मेंदूमधील न्यूरोट्रॉॅफीक घटकांवर परिणाम होतो.